नाशिक - टोलला माझा विरोध नसून टोल वसुलीला विरोध आहे, असे सांगत महाविकास आघाडीत जाणे कदापि शक्य नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला माझा विरोध असून, त्यात कोणतीही स्पष्टता नाही.
मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे. पैसे टोलवाल्यांच्या खिशात जात आहेत किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जात असतील तर ते मी सहन करणार नाही.
परत उपोषण कशासाठी?मराठा आरक्षणप्रश्नी बोलताना राज म्हणाले, आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या, आता परत मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण कशासाठी? असे सांगत हा कुणाच्या राजकीय अजेंड्याचा विषय आहे एकदा विचार व्हायला हवा. मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे.
खड्डे असतील तर टोल कशासाठी घेता?■ रस्त्यांमध्ये खड्डे असतील तर टोल कशासाठी? कोकणातील रस्ता पूर्ण नाही तरी तिथे टोल आहे.■ ट्रान्सहार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे? असा उलट प्रश्न करत राज्य सरकार आणि खासगी लोकांच्या खिशात किती पैसे जातात, असा सवाल त्यांनी केला.