डांगसौदाणे : परिसरातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव, पशुपक्षी यांच्यासोबतच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात न आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी (दि. २५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास डांगसौदाणे शिवारातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला लावलेल्या आगीत वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींकडून लावलेल्या या आगीने ७ वाजेपर्यंत रौद्ररूप धारण केल्याने वनविभागाच्या कर्मचारी, वनसंरक्षक समिती सदस्य व स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे राखीव वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून लाखो रुपये खर्च करून संवर्धन करण्यात आलेल्या बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बऱ्याच राखीव वनक्षेत्रांना आगी लावून हे वनक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, वनविभागाकडून या माथेफिरूचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
इन्फो
तस्करांकडून आगी लावण्याचे प्रकार
राखीव वनक्षेत्रातील मोर, ससे, घोरपड हे वन्यजीव आगीपासून बचाव करण्यासाठी पळ काढतात व दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडतात. तसेच या वनक्षेत्रातील साग, बांबू, शिसव अशा वृक्षांची झालेली कत्तल लपविण्यासाठी तस्करी करणाऱ्यांकडून राखीव वनक्षेत्राला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत वनविभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही.