नाशिक : केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची हॉटेल एमराल्ड पार्क येथे पत्रकार परिषद झाली, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. इतर प्रश्नांपेक्षा वाढत्या महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेट्रोल, डिझेल बरोबरच गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी भोंग्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या जाहीर सभेतून मांडलेली भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या अनिल देशमुख यांना अटक करून इतके दिवस झाले आहेत. १०८ वेळा त्यांच्यावर धाडी टाकूनही त्यांच्याकडे काहीही सापडले नाही तर १०९ व्या वेळी धाड टाकण्याचा विक्रमही करण्यात आला, असे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्यावरील टीकेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची असून याबाबत पक्षीय पातळीवर चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल कारण ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चौकट-
वादानंतर नातं अधिक घट्ट होतं
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, भांड्याला भांड लागलं की थोडेफार वाद हे होतातच आणि ते एक चांगले लक्षण आहे. कारण वाद झाले की नात अधिक घट्ट होत जात. त्यांनाही खासदार शरद पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्या म्हणाल्या.