नाशिक : ‘लोक जगामध्ये मित्र शोधतात, मी मात्र मित्रांमध्येच जग पाहतो !’ असे मैत्रीचे जग उलगडणारी, ‘देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव; जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे कमव !’ असे मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी, ‘आपली मैत्री समजायला वेळ लागेल, पण जेव्हा कळेल तेव्हा वेड लागेल’! असे वेड्या मैत्रीचे संदेश असो की ‘हाक मारलेली नसतानाही जो वेळप्रसंगी मदतीला धावून येतो तो मित्र’ अशी मैत्रीची व्याख्या विशद करणाऱ्या संदेशांनी समाजमाध्यमांवर शनिवारपासूनच गर्दी करीत ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
कोरोनाचे सावट सलग दुसऱ्या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’वर कायम राहणार आहे. कॉलेज बंद असल्याने महाविद्यालयांमध्ये बहरणारा फ्रेंडशिप डेदेखील यंदा होऊ शकणार नाही. त्यात वीकेंड लॉकडाऊन कायम असल्याने गिफ्टची देवाणघेवाण, बँडची बांधाबांध, कॉलेजमध्ये आणि कॉलेजबाहेरील निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे बागडणारे ‘मित्र-मैत्रिणी’ असा कोणताच माहोल यंदाच्या वर्षीदेखील राहणार नाही. मात्र त्यामुळे मैत्रीच्या बहरला बाधा येऊ नये, अशी दक्षता घेण्यासाठी युवा वर्गाकडून समाजमाध्यमांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. युवा वर्गाकडून स्टेटसलाही अशाच स्वरूपाचे विविध संदेश ठेवले जात आहेत, तर अनेक मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या व्हॉटसॲप स्टेटसला शालेय स्नेहसंमेलनात पुन्हा गवसलेल्या जुन्या मित्रांचे फोटो ठेवले आहेत. त्याशिवाय मैत्री दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर शनिवारपासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे आजचा ऑगस्ट महिन्यातील पहिलाच दिवस हा मैत्री दिनाच्या शुभेच्छांनीच बहरणार आहे. अनेक मित्रांनी तर वीकएन्डमुळे हॉटेल्स बंद असल्याने आपापल्या फार्म हाऊसवर किंवा बंगल्यांमध्ये मैत्री दिनी आपल्या खास मर्जीतील मित्रांसह विशेष छोटेखानी गेट टुगेदरचेही बेत आखले आहेत.