नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या भींतघरच्या (गुलाबी गाव) आदिवासी लोकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी सुद्धा पहाडी भागातून आलो आहे. त्यामुळे तुमची जीवनशैली मला माहिती आहे. त्यामुळेच मला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील कार्यक्रमांना येण्यास अधिक आवडते. तुम्हा लोकांमध्येच मला देव दिसतो, अशा शब्दांत कोश्यारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आदिवासी विकास योजनाद्वारे तसेच 'पेसा' सारख्या कायद्यांनी आदिवासी जनतेच्या विकासाला ला गती मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी आवाहन केले. सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
गावात राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन होताच त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. गुलाबी रंगाने सजलेली घरे आणि पारंपरिक वेशात असलेले गावकरी आणि त्यांच्याकडून झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने राज्यपाल कोश्यारी भारावले. त्यानंतर सभास्थानी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि गिर्यारोहक हेमलता गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक वाद्य पावरी आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत करण्यात आले.