लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया, लस घेतली दोनदा मी बया’ अशा अर्थपूर्ण आणि ठेक्यातील गाण्याच्या माध्यमातून आदिवासी भागातील लसीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न गीतकार प्रमोद अहिरे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केला आहे.
आदिवासी भागातील बोरवडला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद अहिरे यांना बहुतांश आदिवासी लसीकरणाला नकार देत असल्याचे दिसून आले. लसीकरणाबाबतच्या काही अफवा आदिवासी समाजाच्या मनांमध्ये घर करून बसल्या आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज आणि भीती दूर झाली नाही, तर कितीही प्रयत्न झाले तरी ते लसीकरण करून घेण्यास तयार होणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मग सर्व आदिवासी बांधवांचा गैरसमज दूर करण्यासाठी काही विशेष गीत तयार करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच मग त्यांनी काही आदिवासी बोलीतील शब्द, काही मराठी शब्द आणि त्याला भारुडाचा ताल देत गाणे लिहून काढले. ‘माझ्या शेजाऱ्याला सांगतो मी बया, लस घेतली दोनदा मी बया, भली गुणकारी लस हाये बया, जिवासाठी लई बेस हाय बया ’ अशा ग्रामीण बोलीभाषेत काही आदिवासी शब्दांची पेरणी त्यात केली. भारत ज्ञान विज्ञान समुदायाच्या माध्यमातून निर्मिती केलेल्या या अनोख्या प्रयत्नातून आदिवासी बांधवांचे गैरसमज आणि भीती दूर करण्याच्या उद्देशाने तयार करून ते त्यांनी यूट्यूबवर अपलोड केले आहे. या चित्रफितीचे लोकार्पण शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते झाले, तसेच स्थानिक स्तरावर त्या गाण्याला वाजविण्याबाबत स्थानिक सामाजिक संस्थांकडे पाठपुरावा केला असून, आदिवासी भागात गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोककलेला आधुनिकतेचा टच दिल्याने वृद्धांबरोबरच तरुणांच्याही पसंतीस हे गीत उतरले आहे.
कलाकारांच्या मेहनतीचे यश
प्रमोद अहिरे यांनी लिहिलेल्या या बहारदार गीताला नाशिकचे उदयोन्मुख संगीतकार निलेश गरुड यांनी अत्यंत ठसकेबाज आणि तितकेच चांगले संगीत दिले आहे. त्यामुळे ठेक्यावर ताल धरू शकणाऱ्या कुणाही रसिकाला गाणे ऐकल्यावर निश्चितपणे आवडते. या गीताला राहुल लेहनार यांच्या दमदार आवाजासह, प्रमोद अहिरे, अर्चना गरुड, प्रवीण देवरे, कैलास सोनवणे, विश्वास वाघमारे या गायकांनी साथसंगत दिल्याने गीतावर आपसूकच पाय थिरकू लागतात. त्यामुळेच सर्व कलाकारांच्या मेहनतीने गाणे जमून आले आहे.
कोट
नागरिकांमध्ये लसीकरणासंबंधी अनेक गैरसमज आहेत. भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे. भारुडाबरोबरच रॅप पद्धतीचा सादरीकरणात समावेश केल्याने अधिक सर्व वयोगटातील आदिवासी बांधवांची त्याला पसंती मिळत आहे. अशा माध्यमातून हे गाणे दुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास वाटतो,
-प्रमोद अहिरे, गीतकार
फोटो
२४गीत