Shiv Sena Rajabhau Waje : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या विविध नेत्यांच्या पक्षांतराबाबत वारंवार चर्चा रंगत असतात. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांबाबतही अशी चर्चा होत असते. अशातच नाशिकमधीलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजभाऊ वाजे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "माझे कुटुंब राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मी साधारण दहा-बारा वर्षापूर्वी उद्धवसेनेत (पूर्वीची अखंड शिवसेना) प्रवेश केला. विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढलो, पण यश मिळाले नाही. तरी पक्ष सोडला नाही. पक्षात फूट पडली. मी खासदार झालो. तेव्हा मलाही पक्ष सोडून आमच्या पक्षात सहभागी व्हा, असा निरोप आला होता. पण, असं कदापि होणार नाही. धनुष्यबाण माझ्या हातातून सुटणार नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नाही," असं खासदार राजाभाऊ वाजे मुलाखतीत म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील शिबिरावेळी खासदार संजय राऊत यांनी 'आम्ही इथेच' या विषयावर खासदार वाजे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मुलाखत घेतली. 'राजाभाऊ उद्धवसेनेचे खासदार फुटीच्या वावड्या उठत असतात, त्यात तुमचे नाव नसते, तुम्ही आहे तिथेच राहिलात, असे का?' असा प्रश्न राऊत यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तुम्हाला आवडते का? यावर वाजे यांनी उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख म्हणून सक्षम असल्याचे सांगितले.
गद्दारांना धडा शिकविणारा ठाणे जिल्हाठाण्यात मोठी गद्दारी झाली. तुम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच का? असा प्रश्न खासदार राजन विचारे यांना विचारला असता ठाणे जिल्ह्यात यापूर्वीदेखील गद्दारी झाली होती. मात्र, गद्दारांना धडा शिकविणारा ठाणे जिल्हा आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आम्हीच पुढे नेत असून, कितीही ऑफर आल्या तरी मी पक्ष सोडणार नाही, अशी ग्वाही विचारे यांनी दिली.
तर पक्षवाढीसाठी संघर्षतुम्ही कडवट शिवसैनिक कसे झालात? कधी डगमगला नाहीत का? असा प्रश्न राऊत यांनी चंद्रकांत खैरे यांना विचारला असता, स्वाभिमानासाठी लढणारा कार्यकर्ता अशी ओळख बाळासाहेबांच्या तालमीत घडल्यामुळे मिळाली. मी कडवट शिवसैनिक आहे. पक्षवाढीसाठी संघर्ष केला आहे. वडील घरी मार्मिक नियतकालिक आणत असत, तेव्हाच शिवसेनेशी जोडले गेलो, असे खैरे यांनी सांगितले.
...तरी पक्ष संपणारा नाही : खासदार अरविंद सावंतआपण अनेक आंदोलने केली, चळवळीत राहिलात हे कसे? असा प्रश्न खासदार अरविंद सावंत यांना विचारला असता बाळासाहेबांचे विचार मनामनात भरले आहेत. कामगारांसह सामान्यांसाठी लढा हे संस्कार बाळासाहेबांनीच दिले. कितीही लोक पक्ष सोडून गेले तरी पक्ष संपणार नाही, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.