संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तोट्यात असलेली बससेवा महापालिकेच्या गळ्यात टाकण्यासाठी एसटी महामंडळ उत्सुक असताना महानगरपालिकेच्या मुखंडांची त्यादिशेनेच पावले वळू लागली आहेत. ‘तोट्यात जाईन, पण एसटी ताब्यात घेईनच’ अशी सध्या महापालिकेच्या काही प्रमुखांची तयारी असून, त्यासाठी पुन्हा एकदा बससेवेच्या व्यवहार्यता पडताळी अहवाल तयार करण्याठी सल्लागार संस्था नियुक्त करण्यात येणार आहे. गेल्या महासभेत जादा विषयात सल्लागार संस्था नियुक्त करण्यास २५ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली आहे. शहर बस वाहतुकीची जबाबदारी ही महापालिकेची आहे किंवा नाही याबाबत वाद तर आहेच शिवाय महापालिकेच्या ऐच्छिक कर्तव्यांमध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तरीही महापालिकेत अनेकदा बससेवेचे प्रस्ताव आले आहेत. महापालिकेने आजवर नियुक्त केलेल्या विविध संस्थांनी शहरात चांगली बससेवा असावी याबाबत अहवाल दिला आहे, परंतु ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही हेही तितकेच स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडेच बीआरटीएस शहरात चालणार नाही हेदेखील महापालिकेने नियुक्त केलेल्या एका संस्थेने स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्र्यांची सूचना डावलणार?महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिकेच्या कामासंदर्भात राजीव गांधी भवनात झालेल्या बैठकीत मांडला होता. मात्र, एकूणच बससेवेचा विचार करता फडणवीस यांनी आता अशाप्रकारची जबाबदारी घेऊ नये, त्यापेक्षा अॅप टॅक्सींच्या धर्तीवर येऊ घातलेल्या अॅप बसचा विचार करावा, असा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येते. हे खरे असेल तर आता थेट मुख्यमंत्र्यांना डावलून बससेवेचा घाट घालणार काय, हा प्रश्न आहे.
तोट्यात जाईन, पण एसटीच घेईन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:14 AM