नाशिक - युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देणार नाही, ते टीका करत असतात. आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देणार नाही. ते सातत्याने टीका करत असतात. तर आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेतोय. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सोबत काम करतोय. आमची युती भक्कम आहे. महाराष्ट्र देशाला नेतृत्व दाखवत आहे.
दरम्यान, नाशिकमधील दुर्गम गावात जीव धोक्यात आणून पाणी आणणाऱ्या महिलांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिथे आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लोखंडी साकव बांधण्यात आला. त्याचे औपचारिक उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांनी केले. तेव्हा ते म्हणाले की, या आदिवासी महिलांबाबत मला समजलं होत. त्या पाणी आणण्यासाठी जीव धोक्यात घालून लाकडवरून चालत जातात, य़ाची माहिती मिळाली होती. आता पुढील तीन महिन्यात तिथे नळाला पाणी देऊन त्यांची सोय करणार, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.