नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार करण्यासाठी आयुर्वेदाने पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले.
‘चरक सदन’ या आयुर्वेद व्यासपीठाच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन दूरनियंत्रक अर्थात रिमोटव्दारे सरसंघचालक भागवत यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी कार्यालयाची वास्तू हा आयुर्वेद व्यासपीठाच्या प्रवासातील केवळ एक टप्पा असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी आयुर्वेद घराघरापर्यंतच नव्हे तर अत्यंत दुर्गम भागातील झोपड्यांपर्यंतदेखील पोहोचलेले होते. त्यामुळेच अडुळशाच्या काढ्याने खोकला, अस्थमात आराम मिळतो, हे आपल्या आजी, पणजीला परंपरेतून माहिती झाले होते. त्याकाळच्या ऋषीमुनींनी सामान्य माणसांनी ते ज्ञान सर्वदूर पोहोचावे, यासाठी जसे व्रतस्थ प्रयास केले, तशाच प्रकारच्या प्रयासांची गरज असल्याचेही भागवत यांनी नमूद केले. प्राथमिक स्तरावर स्वस्तात आणि खेड्यापाड्यातही आयुर्वेदाचे उपचार करता येणे शक्य आहे. व्यक्ती आजारी पडू नये यासाठीचा विचार केवळ आयुर्वेदातच केल्याचे दिसून येते. ‘वेलनेस’ची चिंता केली तर ‘इलनेस’ची चिंता अत्यल्प करावी लागेल. संपूर्ण विश्वाला निरामय बनविण्यासाठी आयुर्वेदाने आणि भारतातील वैद्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही भागवत यांनी नमूद केले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयंत देवपुजारी यांनी शासन केवळ कायदा करु शकते, परिस्थिती बदलण्याचे काम संघटनेलाच करायचे असल्याचे सांगितले. यावेळी वैद्य नानासाहेब जाधव, ज्ञानेश्वर थोरात, रवींद्र जोशी, प्रवीण दवडघाक, कैलास साळुंखे, रणजीत पुराणिक, आशुतोष गुप्ता, शीतल देशपांडे मंदार भणगे, आनंद कट्टी, प्रसाद देशपांडे या वैद्यांसह चरक सदनची वास्तू प्रदान करणारे बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुर्वेद व्यासपीठच्या अध्यक्ष वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य विशद केले. आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक विनय वेलणकर यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करुन मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष संतोष नेवपुरकर, सचिव विलास जाधव आदी उपस्थित होते.