नाशिक : गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी आपण दोनच दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सोमेश्वर देवस्थान हे नाशिकमधील प्राचीन असून, तेथे गेल्यावर्षीच नूतन विश्वस्त नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांच्यातही गटबाजी आहे. त्यातच अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी गेल्या बुधवारी मंदिरातील मुख्य शिवपिंडीला रंगकाम केल्याने वाद वाढला. मंदिराच्या परीसरातील नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर अरुण धोंडू पाटील यांनी पोलिसांत गोरे यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या अंतर्गत पोलिसांनी शिवपिंडीची विटंबना करून भावना दुखावल्याप्रकरणी गोरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांनंतर देवस्थान ट्रस्टचा राजीनामा देणार असल्याचे प्रमोद गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अध्यक्षपदाच्या वेळी आपण या भागाचा विकास करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार गेल्या पन्नास वर्षांत केली नाही इतकी कामे केली असल्याचा दावा त्यांनी केला. प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, अन्न छत्र, रंगरंगोटी अशी सर्व कामे स्वखर्चाने केली. परंतु गावकीच्या राजकारणाने आपली अडचण होत असून, आपल्यावर खोटे आरोप करून अडथळे आणले जात आहेत. इतकेच नव्हे तर गंभीर गुन्हा दाखल केला गेला आहे. गुन्ह्यात जामीन मिळवल्यानंतर दोन दिवसांतच राजीनामा देणार असल्याचेही ते म्हणाले.रंग दिल्याने मतभेदशनिवारी रात्री पिंडीचा रंग काढून ती पूर्ववत करण्यात आली. त्यावरून मतभेद असून, आपणच पिंडीला दिलेला रंग काढल्याचा दावा गोरे यांनी केला आहे तर गोरे आठ दिवसांपासून फरार असून, स्थानिक नागरिकांनीच ते काढून घेतल्याचा दावा केला आहे.
सोमेश्वर येथील मूर्ती रंगकामाचा वाद : गोरे राजीनामा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:36 AM