एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान होत असताना दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार ऐकून तुमच्या मनात चीड आल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही, अशा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत युतीवर हा अन्याय केलाय. याप्रकरणी पिढीत मुलीनं आदिवासी विकास विभागाकडे तक्रार देखील केली आहे. युवतीची तक्रार मिळाली असून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे तिला वृक्षारोपण करण्यापासून शिक्षकांनी रोखलं. "या घटनेला दोन-तीन आठवडे झाले असून आम्ही शाळेत गेलो होतो, त्यावेळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी आम्ही मुली झाडे लावायला गेलो. उपस्थित शिक्षक म्हणाले की मागील वर्षी लावलेली झाडे जळून गेली आहेत. तुम्ही झाडे लावू नका. मासिक पाळी आलेल्यांनी झाड लावलं की ते जळतं अशा आशयाचं उत्तर शिक्षकांनी दिलं", असं तक्रारदार युवतीनं सांगितलं आहे.