सिडको : सिडकोने त्यांच्या ताब्यातील सहाही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असून, हस्तांतरणानंतरच्याच अतिक्रमणाचा मनपाने विचार केला पाहिजे. त्यापूर्वीच्या सर्व घरांच्या बांधकामास सिडकोने परवानगी दिलेली आहे, ही बांधकामे पाडण्याचा मनपाने प्रयत्न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. सह्याद्रीनगर येथील भूखंड हा शिवसेना कार्यालयासाठीच खरेदी केला असल्याची माहिती शिवसेना पश्चिम विधानसभा संपर्क प्रमुख नीलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिडकोच्या विविध प्रश्नासंदर्भात चव्हाण यांनी सांगितले की, सिडकोने नाशिक शहरात सहा योजना उभारल्या आहेत. या योजना उभारून त्यांची देखभाल मनपाने केली असली तरी सिडको हे मागील वर्षीच महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या बांधकामाविषयी आयुक्तांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. सिडकोने परवानगी दिल्यानेच नागरिकांनी हे बांधकाम केले आहे. सिडकोतील प्रत्येक नागरिक घरपट्टी भरत असून, ही घरपट्टी मनपाने नागरिकांना केलेल्या बांधकामाचे मोजमाप करून दिली असल्याने हे क्षेत्र किंवा बांधकाम मनपास मान्य असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. आयुक्तांनी मोहिमेला सुरु वात करावी, शिवसेना त्यांना जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. महापालिकेचे अधिकारी रवींद्र पाटील हे चिठ्ठी लिहून घरातून निघून गेले असून, त्यांचा अद्याप तपास लागत नसून त्यांच्यावर ही परिस्थिती आयुक्तांनीच आणली आहे. त्यामुळे आयुक्तांवरच या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सिडकोची अतिक्र मण मोहीम स्थगित करण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदारांनी केला आहे. भाजपाच्या आदेशानेच हे रेखांकन सुरू करण्यात आले आहे. सह्याद्रीनगर येथील भूखंडावर असलेले शिवसेनेचे कार्यालय अतिक्र मण मोहिमेत काढण्यात आले असले तरी या भूखंडावर शिवसेनेचे संपर्क कार्यालयच उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यालयासाठीच हा प्लॉट घेतला आहे.
सिडकोत कारवाई झाल्यास सेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:46 AM