... तर अजित पवार मुख्यमंत्री असते, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 08:22 AM2023-02-12T08:22:17+5:302023-02-12T08:22:44+5:30
पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, असे पक्षाच्या अनेक नेत्यांना वाटत असले तरी आमच्याकडे पुरेशी संख्या नाही, तसे असते तर सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. यावेळी त्यांनी भाजपने जेलमध्ये टाकण्यासंदर्भात महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांबाबत विचार करण्याचा सल्लाही दिला.
पवार दोन दिवस नाशिकमध्ये हाेते, त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत सहकार मंत्री सावे यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. राज्यातील सरकारची भूमिका केंद्र सरकारच्या सहकारविषयी विसंगत असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या सहकार परिषदेत सावेंचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले. कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याने याबाबत किती गंभीर आहेत, याबाबत शंका असल्याचा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.
भाजपने भूमिकेचा विचार करावा
महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केल्याचा राजकीय ठराव केल्याबाबत पवार म्हणाले, अनिल देशमुख तुरुंगात होते. संजय राऊत यांनाही जेलमध्ये टाकले हाेते. या प्रकरणांत न्यायालयानेच काही आक्षेप नोंदविले. नवाब मलिक अजूनही जेलमध्ये आहेत. त्यामुळे भाजपने विधानाचा विचार करावा.
पंतप्रधान मोदी मुंबईत येत असतील आणि महाराष्ट्राला यातून काही मिळणार असेल तर हरकत नाही, पण जे राजकीय भाषण करत असतील तर त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. भाजप नेत्यांचे पुण्यात वाढलेले दौरे म्हणजे तेथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काम चांगले सुरू असल्याचे लक्षण आहे.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी