नाशिक : कोराेनानंतर जगभरात मंकी पॉक्समुळे धडकी भरली असल्याने सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेच. याशिवाय परदेशातून आलेल्या प्रवाशांना लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोनाप्रमाणेच क्वारंटाईन करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली.
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. जगातील १५ देशांमध्ये मंकी पॉक्स या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे, केंद्राकडून दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राज्यांना याबाबतच्या दक्षतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. बाहेरून आलेल्या रुग्णांना ट्रेस करण्याबाबतही राज्यांना कळविण्यात आलेले आहे. ज्याप्रमाणे कोरोना काळात बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन केले जात होते, त्याप्रमाणेच मंकी पॉक्सबाबतची काही लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांनादेखील क्वारंटाईन करण्याबाबतचे आदेश राज्यांना देण्यात आले असल्याचे भारती पवार यांनी सांगितले.
दरम्यान, मान्सूनपूर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्याच्या दृष्टीने कृषी विभागला सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनेकदा खतांचा पुरवठा झालेला असताना साठा उपलब्ध नसल्याचे सांगून, दुकानदार दिशाभूल करतात. अशा दुकानदारांना समज देण्याबाबत आदेशही देण्यात आले. पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या केसेस अधिक घडतात. अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णावर उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांना याबाबतचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे आजार होऊ नये यासाठी ग्रामीण भागात जलकुंभ स्वच्छतेची मोहीम राबविली जात असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली.