नाशिक : महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवासाठी अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या परवानीशिवाय बेकायदा मंडप किंवा उभारल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मंडळांचे धाबे दणाणले आहे.यंदा १३ ते २३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही सूचना जारी केली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या नियमांची माहिती देण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.मात्र महापौरांना टाळून बैठक होत असल्याने त्यास गणेश मंडळ पदाधिकाºयांनी कडाडून विरोध करीत ही बैठक उधळून लावली होती. त्यामुळे पुन्हा बैठक न घेता आयुक्तांनी थेट सूचना जारी केली असून त्यानुसार २ सप्टेंबरच्या आत महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात एक खिडकी योजनेअंतर्गत परवानगी घेऊन मगच मंडप उभारणी करणे आवश्यक करण्यात आले आहे.मंडपाचा आकार किती असावा तसेच कमानीचा आकार किती असावा, याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाच्या आधारे नमूद केलेली नियमावली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्या आधारे आता पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
गणेशोत्सवाचा बेकायदा मंडप उभारल्यास थेट फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:39 AM