नाशिक : अपात्र कार्डधारकांचा शोध घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठीची माेहीम पुरवठा खात्याकडून राबविली जाणार आहे. या महिन्यात सुरू होणाऱ्या मोहिमेची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे. याबाबतच्या बैठकादेखील पार पडल्या असून फेब्रुवारीत जिल्ह्यात ही मोहीम राबविली जाणार आहे.
अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच रेशनवरील धान्य दिले जाते. त्यामुळे तसेही केसरी आणि पांढऱ्या रंगाच्या कार्डधारकांना रेशनवरील धान्याचा लाभ होत नाही. केशरी कार्डधारकांना अल्पदरात धान्याचा लाभ अनेकदा झालेला आहे. परंतु आता रेशनकार्ड पडताळणी मोहिमेत उत्पन्न गटानुसार रेशनकार्डाची वर्गवारी बदलणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या पुढे आहे त्यांचे कार्ड पांढरे होणार आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ होऊ शकणार नाही.
अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांची वर्गवारीदेखील या मोहिमेत बदलली जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे साहजिकच त्यांच्या रेशनकार्डाचा रंगही बदलला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या तरी मोहीम सुरू झालेली नसली तरी येत्या १५ फेब्रुवारीनंतर केव्हाही ही मोहीम जिल्ह्यात सुरू होऊ शकते.
--इन्फो--
या कारणाने रद्द होणार रेशनकार्ड
या शोधमोहिमेत वापरात नसणाऱ्या रेशनकार्डांचाही शोध घेतला जाणार आहे. रेशनकार्ड जेथे आहे तेथे राहत नसलेले, एकाच घरात दोन रेशनकार्ड तसेच कार्डधारक मयत झाला असल्यास असे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असून पात्र लाभार्थी असेल त्यांना रेशनकार्ड देण्यात येणार आहे. यासाठी कार्डधारकांच्या घरोघरी जाऊन मोहीम राबविली जाणार आहे. रेशन दुकानांमधूनही माहिती भरून घेतली जाऊ शकते.
--इन्फो--
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रेशनकार्ड शोधमोहीम राबविली जाणार आहे. या संपूर्ण परिस्थितीवर समितीच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्राथमिक पातळीवर केवळ बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे अद्याप समितीदेखील स्थापन झालेली नाही.
--कोट---
...तर कार्डाची वर्गवारी बदलणार
रेशनवरील धान्याचा लाभ घेणाऱ्यांना एक लाखाच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. त्यामुळे एक लाखाच्या पुढे ज्यांचे उत्पन्न गेले असेल त्यांचे कार्ड रद्द होणार नाही तर त्यांची वर्गवारी बदलणार आहे. केशरी कार्ड असेल आणि त्याचे उत्पन्न वाढले असेल तर ते पांढरे होईल. जिल्ह्यात अद्याप या मोहिमेला सुरुवात झालेली नाही. मात्र लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी