नाशिक : सन २००५-०६ ते सन २०१३-१४ या कालावधीत दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत अपूर्ण कामांची माहिती पंचायत समिती स्तरावरून अद्याप प्राप्त न झाल्याने सभापती उषा बच्छाव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या तालुक्यांची माहिती प्राप्त होणार नाही, अशा तालुक्यांमध्ये नवीन कामे मंजूर करण्यात येऊ नये, तसेच विलंबास संबंधित तालुक्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावेत, असे आदेशही उषा बच्छाव यांनी समाजकल्याण विभागाला दिले. समाजकल्याण समितीची मासिक बैठक सभापती उषा बच्छाव यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जिल्हा परिषद २० टक्के सेस व ३ टक्के अपंग निधीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. वृद्ध कलाकार मानधन योजनेचा आढावा घेण्यात येऊन आतापर्यंत ६०३ वृद्ध कलाकारांना नियमित मानधन अदा केले जात असून, नव्याने ६० वृद्ध कलाकारांचे मानधन मंजूर करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी यांनी सांगितले. अपंगांसाठीचा ३ टक्के सेसचा निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचना उषा बच्छाव यांनी दिल्या. आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेत मागील वर्षाचे ९ प्रस्ताव प्रलंबित असून, सन २०१४-१५ या वर्षामध्ये ११९ प्रस्ताव असे एकूण १२८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. शासनाकडून या योजनेसाठी ४२ लाख निधी मंजूर झालेला असून, लवकरच लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. या योजनेतून लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख किंवा धनादेशाद्वारे दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीस सदस्य निर्मला गिते, इंदूबाई गवळी, स्वाती ठाकरे, शीतल कडाळे, सुभाष गांगुर्डे, बंडू गांगुर्डे, साईनाथ मोरे, अर्जुन मेंगाळ, गोपाळ लहांगे, अनिता जाधव आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अपूर्ण कामांची माहिती न दिल्यास मंजुरी रोखा समाजकल्याण समिती
By admin | Published: February 15, 2015 12:02 AM