नाशिक : आपण लोकांसाठी असून, लोक आपल्यासाठी नाहीत. त्यामुळे शासकीय सेवेत काम करताना शासनावर आपण उपकार करीत आहोत, अशी भावना बाळगण्यापेक्षा काम जमत नसेल तर घरी बसा, असा सज्जड दम विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याप्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. बैठकीस उपआयुक्त पारस बोथरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, संदीप माळोदे, उद्धव खंदारे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते. दुपारी सव्वातीन वाजता या आढावा बैठकीस सुरुवात झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच आयुक्त एकनाथ डवले यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम व त्याअनुषंगाने घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमधून किती विद्यार्थी, अ, ब, क व ड वर्गात आले याची माहिती त्यांनी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांची उजळणी घेतली. त्यात निफाड, मालेगावसह दिंडोरी व सुरगाणा गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी याच मुद्द्यांवरून धारेवर धरल्याचे समजते. तसेच बहुतांश गटशिक्षणाधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांचीही कान उघडणी केल्याचे समजते.
जमत नसेल तर घरी बसा
By admin | Published: January 21, 2015 1:59 AM