नाशिक- गंगापूर धरण आता तळ गाठत असून जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोन वेळ पाणी पुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली.
गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असून पाऊस देखील पडत नसल्याने सध्या शहरावर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. नाशिक शहराला ३० जुलै पर्यंत पुरेल इतके पाणी असले तरी पावसाची एकंदरच स्थिती बघता कोणत्याही क्षणी पाणी कपात होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूर धरणात सध्या असलेले पाणी हे जलविहीरीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू कले आहे. त्याचे काम सुरू असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२२) पाहणी दौरा केला.
गंगापूर धरणात सध्या ९०० दश लक्ष घन फुट पाणी शिल्लक असून त्यातील साडे पाचशे दश लक्ष घन फुट पाणी नाशिक महापालिकेसाठी आरक्षीत आहे. तथापि, संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता शहरातील ज्या भागात दोन वेळ पाणी पुरवठा होत आहे, तेथे एकवेळ पाणी पुरवठा करता येईल काय, त्याचे नियोजन कसे करता येईल यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली.यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता दिनकर पाटील, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, मनसे गटनेता सलीम शेख आदी उपस्थित होते.