युतीने तिकीट नाकारल्यास अनेकांची पक्षांतराची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:46 AM2019-09-29T00:46:50+5:302019-09-29T00:47:29+5:30
विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेषत: भाजपा-सेनेतील अनेक जण कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. अनेक पक्षांकडेदेखील तुल्यबळ उमेदवार नसल्याने असे पक्षदेखील संबंधिताना चुचकारू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. भाजपा-सेनेत अनेक इच्छुकांनी अगोदर तयारीच नव्हे तर प्रचारालादेखील प्रारंभ केला आहे. हा प्रचारच नव्हे तर स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे की, एकमेकांच्या विरोधात तक्रारींचे स्वरूपदेखील बघण्यास मिळत आहे. भाजपात शहरातील तीन मतदारसंघांत किमान अर्धा डझन इच्छुक आहेत तर शिवसेनेत पश्चिम मतदारसंघात अनेक दावेदार आहेत. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र नाही. कळवण, चांदवड-देवळा आणि नांदगाव-मनमाड येथे अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेतदेखील इच्छुकांची संख्या वाढतच आहे. त्यातच युतीचा निर्णय होत नसल्याने अनेक जण हवालदिल आहेत. तयारी तर करून ठेवली आहे, परंतु जागा सुटेल किंवा नाही हे सांगता येत नसल्याने अनेक इच्छुक अस्वस्थ आहेत. तयारी झालीच आहे तर निवडणूक लढवायचीच किंवा आता खूप पुढे गेलो आहे, असे सांगून इच्छुक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागा सुटली नाही किंवा उमेदवारीच मिळाली नाही तर अपक्ष म्हणून बंडखोरी करण्यापेक्षा अन्य पक्षाचे लेबल लावलेले अधिक लाभदायी ठरेल, या अपेक्षेने इच्छुकांची तयारी सुरू आहे. युतीतील अनेक जण मनसे तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या संपर्कात आहेत. मध्य आणि पश्चिम नाशिकमधील भाजपाचा एक इच्छुक राष्टÑवादीच्या संपर्कात आहे, असे सांगण्यात येत आहे. भाजपाचा एक विद्यमान आमदारदेखील पक्षाने उमेदवारी नाकारली आणि युती तुटलीच तर शिवसेना परवडली अशा भूमिकेतून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.
मनसेची तर उघड भूमिका
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडे कुठे ना कुठे उमेदवार नसल्याने त्यांची अडचण होत आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पंधरा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी उमेदवार नसल्याने ऐनवेळी अन्य पक्षांतून येणाऱ्यांचा विचार करू, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिक पश्चिममधील शिवसेनेच्या एका इच्छुकाने मनसेशी संपर्क वाढवला आहे. युतीत जागा न सुटल्यास मनसेकडून लढवणार असल्याचे या इच्छुकाचे समर्थक सांगत आहेत. अशाच प्रकारे अन्य पक्षातदेखील आपल्याकडील इच्छुकापेक्षा अन्य पक्षातील सबळ उमेदवार असेल तर चालेल, अशीदेखील भूमिका घेत आहेत. त्यामुळे बहुतांशी पक्षांचे युतीचे काय होते आणि त्यानंतर उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष लागून आहे.