नामपूर : कोरोनाने अवघे जग वेठीस धरले असताना या महामारीतून मानवजातीला सावरण्यासाठी जो तो आपापल्या परिने योगदान देत आहे. त्यात बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात दुसऱ्या इयत्तेत शिकणा-या जायखेडा येथील बालचित्रकार समर्थ प्रकाश शेवाळे याने ‘उगारली असेल काठी, केवळ तुमच्याच हितासाठी’ या शीर्षकाखाली सामाजिक संदेश दिला आहे.समर्थ शेवाळे हा विविध चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक सतत जनजागृती करीत असतो. त्याचप्रमाणे त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चित्र रेखाटून जनतेला एक बोलका संदेश दिला आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरु आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडलेल्या माणसांवर पोलिसांनी जरी काठी उगारली असली तरी ती आपल्याच हितासाठी असल्याने त्याचा कोणीही राग, द्वेष करु नये, असा विचार त्याने चित्राद्वारे मांडला आहे. तसेच कोरोना विषाणूशी लढा देणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी हे मानवतेचे पुजारी आपला जीव धोक्यात घालून व रस्त्यावर उतरु न जनतेची सेवा बजावित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या घरातच थांबून या सर्व घटकांना आपण सहकार्य करु न साथ देऊया असा आशय त्याने आपल्या चित्रातून व्यक्त केला आहे.