नाशिक - रुग्णांवर उपचार करण्याचे कार्य वर्षानुवर्षे करणारे डॉक्टर्स स्वत: जेव्हा आजारी पडतात, तेव्हा तो आजार अगदी प्राथमिक असेल तर त्यावेळी स्वत:च गोळ्या निश्चित करून उपचार घेतात. मात्र, आजाराचे स्वरूप थोडे भिन्न असेल किंवा त्या आजाराबाबतचा स्पेशालिस्ट कुणी डॉक्टर त्यांचा मित्र, सहकारी किंवा परिचित असला तर त्या डॉक्टरांशी चर्चा करून किंवा त्यांच्याकडे जाऊन तपासणी करून घेत उपचार घेण्यास प्राधान्य देतात.
दोन दशकांपूर्वीपर्यंत सामान्य एमबीबीएस किंवा बीएएमएस डॉक्टरच संपूर्ण फॅमिलीचे डॉक्टर म्हणून उपचार करायचे. त्यात अगदी बालवयापासून ते ज्येष्ठांपर्यंत, तसेच केस गळतीपासून बहुतांश गंभीर आजारांपर्यंत तेच उपचार करायचे. मात्र, गत दोन-अडीच दशकात प्रत्येक शाखेत सध्या स्पेशलायझेशन असलेले डॉक्टर्स निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणत्याही डॉक्टरांना जर स्वत:ला काही आजारपण आले तर ते सामान्यत: स्वत:च त्यावर उपचार करून घेतात. मात्र, रोग किंवा गंभीर दुखणे आले, तर त्यासाठी मात्र उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, त्यांचे औषधोपचार, तज्ज्ञांकडून गरज भासल्यास शस्त्रक्रियादेखील करून घेतात. सामान्य नागरिकांप्रमाणेच त्यामुळे आजार कुठला आहे, कितपत गंभीर आहे त्यावरच उपचार कोणत्या तज्ज्ञाकडून करून घ्यायचा ते निश्चित करण्याची बहुतांश डॉक्टरांची पद्धती असते.
आजारपण हे कुणालाही येऊ शकते. विशेषत्वे कोरोना काळात, तर बहुतांश डॉक्टर किमान एकदा तरी बाधित झाला. कितीही काळजी घेतली तरी बाधितांपैकी कुणाचा तरी संपर्क येऊन आजारी पडावेच लागले.
मी दुसऱ्या लाटेत कारोनाबाधित झालो होतो. त्यावेळी उपचारपद्धती माहिती असल्याने स्वत:च विलगीकरणात राहून उपचार करून घेतले होते. त्यातून बरे झाल्यानंतर पुन्हा रुग्णसेवेला प्रारंभ केला.
कोरोनापूर्वी कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याबाबत फारशी चिंता नव्हती. मात्र, आता आपल्यामुळे कोरोना घरातही पोहोचू शकतो, हे दडपण वाढले आहे.
डॉ. शैलेंद्र नाजरे