नाशिक - शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच बंडखोरांना मदत करणाऱ्या भाजपालाही संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
काही आमदार गेले म्हणजे शिवसेना फुटली असं होत नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. ही ताकद शिवसेनेचीच आहे. गुलाबरावांचा जुलाबराव होईल, ५० खोकी पचणार नाही. ही बेईमानी पचणार नाही. हा खरा आणि खोट्यातील वाद नाही तर ईमानदार आणि बेईमानीमधील वाद आहे.
आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला.