येवला : नाशिक जिल्ह्याने माझी कधीच साथ सोडली नाही. त्यामुळेच सभेसाठी नाशिकची निवड केली. माझा अंदाज सहसा कधी चुकत नाही. पण येवल्याच्या बाबतीत तो चुकला, त्यामुळे येवलेकरांची मी जाहीर माफी मागतो, असे सांगत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर मोदी सरकारने आम्हाला शिक्षा द्यावी, असे आव्हानही पवार यांनी दिले. राष्ट्रवादी पक्षातील फूट व राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी आपली पहिली जाहीर सभा पक्ष सोडून गेलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात शनिवारी (दि. ८) घेतली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदिस्त शेडमध्ये आयोजित या सभेला खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा, आमदार अशोक पवार यांची विशेष उपस्थिती होती. सायंकाळी ५ वाजता शरद पवार यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात शरद पवार यांनी भुजबळ यांचा नामोल्लेख न करता टीकास्त्र सोडले.
पवार म्हणाले, नाशिक जिल्हा म्हटलं की माजी आमदार जनार्धन पाटील, मारोतराव पवार, अंबादास बनकर यांची आठवण होते. या जिल्ह्याने मला नेहमीच साथ दिली आहे. मी येथे कुणाचे कौतुक करण्यासाठी आलो नाही. परंतु माझा येवल्याबाबतचा अंदाज चुकल्याने तुम्हाला ज्या यातना झाल्या, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. यापुढे लोकांसमोर जायची वेळ येईल तेव्हा मी पुन्हा येथे येईल. येथील अनेक प्रश्न आहेत. राजकारण्यांनी सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. या प्रशांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी लोकांनी पुन्हा शक्ती देण्याचे काम करावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेलशरद पवार यांनी सांगितले, माझ्या वयाबाबत वारंवार उल्लेख होतो आहे. माझे वय ८३ आहे. परंतु माझ्या वयाकडे पाहू नका, हा गडी काय आहे, ते पहा. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, अशा इशारा देताना आम्ही असले वैयक्तिक हल्ले करत नसल्याचे सांगितले.