नाशिक : प्रयत्नांती परमेश्वर या उक्ती नुसार आत्मपरीक्षण करून योग्य खेळाची निवड केली तर आपल्याला त्यात नक्कीच यश मिळते. त्यातून आपले व आपल्या देशाचे भवितव्य आपण उज्वल करू शकतो असे मत सुवर्णपदक विजेता रोईगपटू दत्तू भोकनळ यांनी व्यक्त केले. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय व ओ.एन.आर.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.21) नौकानयन दत्तू भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी खेळातील विविध अनुभव विद्यार्थ्यासमोर उलगडले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील नौकायन (रोईंग) या सांगिक स्पर्धेत भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने दत्तू भोकनळ या चांदवड तालुक्यातील छोट्या गावातील भूमीपुत्राने नाशिक जिल्ह्याची आणि देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून देशास समृद्धी प्रदान करावी यासाठी आदर्शवत अनुकरणीय व्यक्तिमत्व विद्यार्थांसमोर ठेवण्याच्या दृष्टीने दत्तू भोकनळ यांची भेट विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल असेही त्यांनी सांगितले.