नाशिक : गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर गंगापूर धरणातील पाणीसाठा आॅक्टोबरअखेर ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत राहिलेला आहे. यंदा लहरी पावसामुळे गंगापूर धरण ७० टक्केच भरू शकले आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात एकदाही गोदावरी दुथडी भरून वाहिल्याची आणि दुतोंड्या मारुती कमरेच्या वर बुडाल्याचे नाशिककरांनी पाहिलेले नाही. धरणातील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेत नाशिक महापालिकेने भविष्यातील पाणीसंकटाच्या हाका सावधपणे ऐकल्या आणि ९ आॅक्टोबरपासून शहरात पाणीकपात करत एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशा स्थितीत गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचे आदेश काढले गेल्याने ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार’ अशी सार्वत्रिक भावना नाशिककरांमध्ये आहे. गंगापूर धरणाच्या माथ्यावर असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये किती पाऊस झाला, यावर धरणातील पाण्याच्या पातळीचा अंदाज नाशिककर काढत आले आहेत. गेल्या पाच-सात वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे जून-जुलै महिना बव्हंशी कोरडा जातो आणि आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत पाऊसमान समाधानकारक राहत धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या आसपास जाऊन पोहोचतो. धरण कधीही १०० टक्के भरू दिले जात नाही. त्यामुळे ९० ते ९३ टक्क्यांच्या आसपास धरणातील पाण्याची पातळी जाऊन पोहोचली की विसर्ग केलाच जातो. याच विसर्गाचा (नियोजित आवर्तनाशिवाय) आजवर मराठवाड्याला अनेकदा लाभ झालेला आहे. २०१२ मध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडीला पाणी सोडण्याची मागणी झाली होती आणि २०१३ मध्ये नगर आणि नाशिकमधून १०.५३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यावेळी धरणातून ५ हजार क्यूसेक प्रतितास वेगाने विसर्ग करूनही जायकवाडी धरणापर्यंत ४० टक्के पाणी झिरपले आणि ६.५२ टीएमसी पाणीच जायकवाडीला जाऊन पोहोचू शकले होते. २०१४ मध्ये परतीच्या पावसानंतरही बेमोसमीपावसाने जिल्ह्याची पाठ पार मार्च २०१५ पर्यंत सोडलेली नव्हती.
आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून टाकणार?
By admin | Published: October 25, 2015 10:58 PM