नाशिक : शहरात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने आता मास्कचा वापर सक्तीचा केला असून, सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर न करणाऱ्यांना दोनशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. साथ रोगप्रतिबंधक कायद्याअंतर्गत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरात मास्क लावणे बंधनकारक असल्याचे अगोदरच सक्तीचे करण्यात आले आहे. तथापि, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताच शहरात गर्दी होऊ लागली आहे. मास्क न वापरणाऱ्यांचा वावरदेखील वाढत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. शहरात आधीच कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, ती सातशेच्या पार गेली आहे, तर मृत्यांचा आकडा ३९ झाला आहे. त्यामुळे सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्यासाठी आयुक्तांनी आता मास्क न वापरणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यातून प्रवास करताना मास्कचा वापर सक्तीचा असून, त्याचे उल्लंघन केल्यास दोनशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.नाशिक शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू, पान, गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड यापूर्वी करण्यात येत होता. ४६ जणांना अशाप्रकारे दंड करण्यात आला होता. आता त्यापलीकडे जाऊन एकदा थुंकल्यास एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा, तर दुसºयांदा असाच गुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा, तर तिसºयांदा गुन्हा केल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. शिवाय पाच दिवस सार्वजनिक सेवा करावी लागणार आहे.
आता मास्क न लावल्यास दोनशे रुपये होणार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:13 PM