नाशिक : कोरोनाची ही दुसरी लाट प्रचंड वेगवान असून, या लाटेत प्रत्येक वयोगटातील नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाच्या आदेशानुसार अजिबात घराबाहेर पडू नये. जे कुणी विनाकारण घराबाहेर फिरतील, त्यांना जीवाला मुकावे लागेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे.
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने शिस्त पाळणे अत्यावश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे तर अत्यावश्यकच आहे. अमेरिकेत भारतापेक्षाही खूप भयानक परिस्थिती होती. मात्र, तेथील नागरिकांनी प्रचंड शिस्तीचे दर्शन घडविले. घराबाहेर नाही, म्हणजे अजिबात नाही, हा अनुभव मी घेतला आहे. तशाच शिस्तीचे दर्शन नागरिकांनी भारतात घडविण्याची गरज आहे, तसेच जर नागरिक ऐकत नसतील, तर पोलीस प्रशासनाने त्यांना नियम बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. अगदी सकाळच्या वाॅकसाठीही बाहेर पडण्याची गरज नाही. जो काही व्यायाम करायचा, तो घरातल्या घरात करायला हवा. घराबाहेर पडून उन्हात जाऊ नका, लस घेण्यासही गर्दी करू नका. कोरोनाने आजारी पडणाऱ्या नागरिकांचे पैसे तर जातीलच. मात्र, जीवही गमवावा लागण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संकटाच्या शक्यतेपासूनही लांब राहणे हीच सध्याच्या काळाची गरज आहे.
इन्फो
प्रत्येक नागरिकाने हा महिनाभर अधिकाधिक लिंबूवर्गीय फळे खावीत. संत्रे, मोसंबी, लिंबूपाणीचा वापर वाढवावा. त्याने प्रतिकारशक्तीत भर पडेल, तसेच किमान सकाळ, संध्याकाळच्या वेळेत थोडासा व्यायाम करून कोमट पाणी प्यावे. कोणत्याही थंड पदार्थापासून कटाक्षाने दूर राहणे आवश्यक आहे. इतकी दक्षता घेतली, तरी कोरोनापासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.
डॉ.शिरीष देशपांडे, माजी अध्यक्ष, आयएमए