नाशिक : शहर व परिसरात गल्लीबोळात गुंडगिरी फोफावू लागल्याचे दिसून येत आहे. विविध पोलीस ठाण्यांसमोर हे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील एका मिठाईच्या दुकानदाराला खंडणीसाठी धमकाविल्याचा धक्कादायक प्रकार सणासुदीच्या काळात उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्या खंडणीखोराला बेड्या ठोकल्या असल्या तरी असे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले पोलिसांना उचलावी लागणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मिलिंदनगर येथील पंचम स्वीट नावाच्या मिठाईच्या दुकानात संशयित आरोपी किरण हलवार (रा.मिलिंदनगर) यादने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुकानात येऊन फिर्यादी धन्नाराम हंसारामजी चौधरी (३७,रा. राहुल अपार्टमेंट, उपनगर) यास धमकावून ह्यतुला दुकान चालवायचे असेल तर गँगला ५ हजारांचा हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला दुकान चालवू देणार नाही, आणि पोलिसांकडे तक्रार केली तर तुला जीवंत सोडणार नाहीह्ण अशी धमकी दिली. गँगसाठी ५ हजारांची मागणी करत ५०० रुपये रोख घेऊन संशयित आरोपी किरण हा निघून गेला. त्यानंतर पुन्हा येत उर्वरित पैशांची मागणी करु लागला. तसेच दुकानातील मिठाईच्या ट्रे ची आदळआपट करुन चौधरी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ गुन्हा दाखल करुन घेत किरणला शनिवारी (दि.२४) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या उर्वरित गँगचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरिक्षक प्रविण शिंदे हे करीत आहेत.