बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात कालपासून पावसाचे थैमान कायम असून, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वभागाला पावसान ेचांगलेच झोडपून काढले.परिसरातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओंडओहोळ नदीपात्रावरील पुलावरून पूरपाणी वाहत असल्याने मुंढेगाव ते घोटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. जानोरी, बांडेवाडी आदि बारा वाड्यांचा संपर्कतुटला आहे, तर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील काही दुभती जनावरे बेपत्ता झाली आहेत. बेलगाव कुऱ्हे येथील नदीला पूर आल्याने येथील स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच्या भात आवणीसह इतर शेतीची कामेदेखील खोळंबली आहेत. इगतपुरी-भगूर महामार्गावरील शेणीतदरम्यान दारणा नदीच्या पुलावरून पूरपाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली, तर लोहशिंगवे येथील गराडी पुलावरून लष्कर हद्दीतून आलेले पुराचे पाणी एकरूप झाल्याने १० ते १५ गावांचा संपर्क तुटला आहे. भगूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना व शाळकरी मुलांना धोक्याची सूचना देऊन या पुरातून लोहशिंगवे येथील सरपंच संतोष जुंद्रे, उपसरपंच शिवाजी डांगे, वंजारवाडीच्या सरपंच कमल अशोक कातोरे, संपत सामोरे, भाऊसाहेब शिंदे, तुकाराम पाटोळे, आनंदा सामोरे, अंबादास धोंगडे यांनी मदतकार्य करीत सुखरूप बाहेर काढले व माणुसकीचे दर्शन घडविले. आज भगूर येथील बाजार असल्याने नागरिकांची मोठ्याप्रमाणात तारांबळ झाली. अस्वली स्टेशन येथील बाळू सवणे यांच्या घरात पाणी शिरल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काबाडकष्ट करून साठवलेला तिखट मिठाचे डब्बे असे साऱ्यांचे भिजून नुकसान झाले. (वार्ताहर)
इगतपुरी : पूर्वभागात पावसाचे थैमान, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुस्तां
By admin | Published: August 02, 2016 11:09 PM