घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले.तालुक्यातील घोटी-सिन्नर रस्त्यावरील पिंपळगाव मोर शिवारात शुक्रवारी संध्याकाळी मॅजिक प्रवासी वाहन (क्र. एमएच १५ पीएम ८९८१) व कंटेनर (क्र. एमएच २० डीई ४०५१) यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मॅजिकचे चालक विठ्ठल भारमल (३४) हे जागीच ठार झाले. दोन्ही वाहने भरधाव असल्याने प्रवासी वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकून होता. सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी व इतर कर्मचाºयांनी वाहनाचे पत्रे कापून त्यास बाहेर काढले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा अपघात टाके देवगाव शिवारात घडला. त्र्यंबकेश्वरवरून खोडाळा येथे मका घेऊन येणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने घाटात उलटला. यात हमाल अमृता मधुकर बोडके (५५) जागीच ठार झाले. दोन्ही अपघातांनंतर दोन्ही वाहनचालक फरार आहेत. तिसरा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा घाटात घडला. मुंबईहून नाशिककडे येणारी वेगेनार कार चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल चारशे फूट दरीत कोसळली. दैव बलवत्तर म्हणून सर्व सहा प्रवासी बचावले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
इगतपुरी तालुका : रात्री घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटना अपघातांत दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:42 PM