आरोग्य विभागाची सज्जता : लसींचा पुरवठा, नागरिकांना दिलासा
घोटी : इगतपुरी तालुक्यात कोरोना महामारीला नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यात लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. इगतपुरीसारख्या आदिवासी बहुल तालुक्यातही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची वाढती मागणी व लसींचा काही प्रमाणात वाढलेला पुरवठा यामुळे लसीकरणाने गती घेतली आहे.
तालुक्यात लसीकरणाने लाखाचा टप्पा गाठल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असले तरी सध्याही लस घेण्यासाठी तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागल्याने लसींचा आणखी वाढीव पुरवठा होऊन तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एका बाजूला लसीकरणाची संख्या वाढत असताना ग्रामीण भागातही आता लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढून प्रतिसाद मिळत आहे. सध्या तालुक्यात दहा लसीकरण केंद्रे व दोन ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. तसेच धारगाव, नांदगाव सदो, काननवाडी, वाडीव-हे, बेलगाव कुर्हे, काळुस्ते, धामणगाव खेडभैरव या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. अद्यापही ही मोहीम जोरात सुरू आहे.
---------------
नागरिकांना दिलासा
इगतपुरी तालुक्यात जवळपास एक लाख चार हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून प्रारंभिक स्थितीत दररोज दोनशे ते चारशे लसी उपलब्ध होत होत्या. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून लसीचा पुरवठा दररोज एक हजारांच्यापेक्षा जास्त होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. यात झालेल्या लसीकरणात सर्वाधिक कोव्हिशिल्ड या लसीचा तर त्यापाठोपाठ कोव्हॅक्सीन या लसीचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
----------------
सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लसीकरणाबाबत करण्यात आलेले प्रबोधन, लोकल रेल्वे प्रवासासाठी दोन लसींची असलेली अट यामुळे सर्वच भागात लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे. यात आता १८ ते ४४ वयोगटातील युवक वर्गाचाही भरणा लसीकरणासाठी आकर्षित होत आहे.
-------------------------
इगतपुरी तालुक्यात सुरुवातीला लसींचा पुरवठा मर्यादित होता. त्यामुळे लसीकरणाचा वेग कमी होता. परंतु सध्या लसींच्या पुरवठा वाढत असल्याने लसीकरणाची गतीही वाढत आहे. आगामी काळातही आणखी जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्यास लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात येईल. येत्या दोन महिन्यात लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. तालुक्यात लसीकरणाने लाखाचा टप्पा गाठला. यात आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व आरोग्य यंत्रणेतील सर्वच घटकांचे योगदान आहे.
- डॉ. एम. बी. देशमुख - तालुका वैद्यकीय अधिकारी
-------------------------------