पंचवटी : ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी मनपाने पंचवटी परिसरातील दुकानांसमोर बसविलेल्या डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे एकीकडे डस्टबिन खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे डस्टबिनचे झाकण चोरी झाल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुकानांसमोर बसविलेल्या डस्टबिनचे झाकण चोरी गेल्याने डस्टबिनमधील कचरा दुकानांसमोर साचून राहत आहे. डस्टबिनचे झाकण चोरी झाली असली तरी याबाबत मनपाला थांगपत्ता नसल्याने चोरट्यांनी आता मनपाच्या मालमत्ता टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. मालेगाव स्टॅन्ड परिसरात मनपाने काही दिवसांपूर्वीच ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दुकानांसमोर डस्टबिन बसविले होते, मात्र मध्यरात्रीच्या सुमाराला भुरट्या चोरट्यांची नजर या डस्टबिनवर पडली व चोरट्यांनी डस्टबिनची झाकण तसेच डस्टबिनला लावलेल्या साखळ्याही चोरून नेल्या आहेत.
पंचवटीत लावलेल्या डस्टबिनकडे मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:35 PM