लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : गत दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या महामारीने शहराबरोबर ग्रामीण भागांतही पाय पसरले असल्याने आता तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जनतेच्या मनात घर करून बसलेली कोरोनाची भीती, गैरसमज व अफवांनी प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. त्यांच्यात जागृती करण्यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असला तरीही कोरोना चाचणी, लसीकरण व उपचारासंदर्भात नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत नसल्याने चांगलीच कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कोरोनाच्या आजारावर योग्य उपचार करण्याऐवजी आदिवासी बांधवांकडून स्थानिक गावठी उपचारांवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.
पेठ तालुक्यात १४४ महसुली गावे व २०० गाव-वाड्या असून साधारण १ लाख ३७ हजार लोकसंख्या आहे. मागील वर्षी कोरोनापासून बऱ्यापैकी दूर असलेल्या पेठ तालुक्याला दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने चांगलेच हैराण केले. जिल्ह्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी मृत्यूचा आकडा वाढल्याने प्रशासनासह जनतेच्या मनातही कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. पेठ नगरपंचायत क्षेत्रात ग्रामीण रुग्णालयातील २१ ऑक्सिजन बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, मागील महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने पेठ तालुक्यातही याची झळ पोहोचली. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी मुलांच्या शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यात भुवन, कुंभाळे, जोगमोडी, आंबे, करंजाळी, कोहोर, कुळवंडी या ७ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तसेच २९ आरोग्य उपकेंद्रे आहेत.
लसीकरणाबाबत जनजागृती!
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने सर्वच नागरिकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून तालुक्यात प्रारंभापासून पुरेसा लससाठा उपलब्ध असूनही नागरिक स्वतःहून लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नाहीत. मध्यंतरी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत कुटुंब सर्वेक्षण करताना आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना नागरिकांनी लसीकरण करून न घेण्यामागची अनेक मनोरंजक कारणे सांगितली. दुर्गम भागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रशासन, आरोग्य व शिक्षण विभाग यांच्यासह विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी विविध माध्यमांचा वापर करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहेत गैरसमज?
आदिवासी भागात विशेषतः अतिदुर्गम वाडी-वस्तीवर राहणाऱ्या अशिक्षित व प्रौढांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणीसंदर्भात ऐकीव माहितीवरून गैरसमज पसरले आहेत. लस घेतल्यावर ताप येतो आणि तपासायला गेले की कोरोना निघतो, सरकारी दवाखान्यात गेले तर आधी कोरोना तपासणी करतात मग त्याला दवाखान्यातच ठेवून घेतात, कोरोनाने मृत्यू झाल्यावर घरच्यांना जवळ येऊ देत नाहीत. अशा अनेक अफवा जनतेच्या मनात घर करून बसल्या आहेत. स्थानिक गावठी उपचार करून रोग बरा होतो अशी धारणा असल्याने सरकारी औषधे घेण्याची टाळाटाळ केली जात असून, आम्ही रानावनात राहतो. आम्हाला काही होत नाही, अशी चुकीची धारणा नागरिकांची तयार झाली आहे.
जनजागृती सर्वच सरसावले
ग्रामीण भागातील जनतेच्या मनातील कोरोना लसीकरण व कोरोना चाचणीबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सरकारी यंत्रणेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी हे गावागावांत जाऊन जनतेचे प्रबोधन करीत आहेत. यशोदीप सामाजिक संस्था, सोशल नेटवर्किंग फोरम, श्रमजीवी संघटना यांच्यामार्फत गाव स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. आदिवासी कवी देवदत्त चौधरी हे स्थानिक बोलीभाषेतून जनतेचे प्रबोधन करीत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनातील भीती दूर होत असून, लसीकरणाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे.
कोट...
सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून, पेठ तालुकाही या महामारीतून सुटला नाही. दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना करताना बरेच जवळचे मित्र, नातेवाईक, सोबती आपल्याला सोडून गेले आहेत व काही अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. येणाऱ्या तिसऱ्या लाटेतून आदिवासी लोकांना वाचवायचे असेल तर लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे.
- गिरीश गावित, अध्यक्ष, यशोदीप सामाजिक संस्था, पेठ
कोट...
अनेक दिवसांपासून प्रशासकीय आढावा बैठका तसेच कोरोनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी पेठ तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यावर स्थानिक जनतेत कोरोनाची भीती निर्माण झाल्याचे दिसून आले. कोरोना चाचणी व लसीकरणाबाबत अनेक गैरसमज व अफवा आहेत. लोकप्रतिनिधी, प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करून जनतेच्या मनातील भीती दूर करण्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- नरहरी झिरवाळ, आमदार, पेठ - दिंडोरी
दृष्टिक्षेपात तालुका : महसुली गावे - १४४
ग्रामपंचायती - ७३
लोकसंख्या - १ लाख ३७ हजार
ग्रामीण रुग्णालय - १
प्राथमिक आरोग्य केंद्रे - ७
उपकेंद्रे - २९
एकूण लसीकरण - ११,४८८
पुरुष लसीकरण - ६,२०४
स्त्री लसीकरण - ५,२८४
पहिली लाट दुसरी लाट
रुग्ण - १०९ ६९७
मृत्यू - ४ २३
बरे - १०५ ६१७
===Photopath===
180521\311018nsk_49_18052021_13.jpg~180521\311018nsk_50_18052021_13.jpg
===Caption===
आदिवासी महिलेला लसीकरण करताना.~गिरीश गावित