नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याचे समोर आल्यानंतही शिक्षण विभागाकडून या कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. क्षमताबाह्य प्रवेशाविषयी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सर्व शिक्षण उपसंचालकांसह सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना महापालिकालगतच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा प्रवेशांची चौकशी करून अतिरिक्त प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.अकरावीच्या आॅनलाइन प्रक्रियेला फाटा देऊन एकत्रित प्रवेश मिळविण्यासाठी तसेच बायोमेट्रिक हजेरी चुकविण्यासाठी अनेक खासगी क्लासचालकांनी शहर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांसोबत संगनमत करून प्रवेक्ष क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करून घेतले आहे. नाशिकमधील गिरणारे व ढकांबे येथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे क्षमतपेक्षा अधिक प्रवेश झाल्याची माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी यांनी पुष्टी केली होती. शिक्षण विभागाने या संबंधित महाविद्यालयांंकडे कानाडोळा करीत क्षमताबाह्य प्रवेशांकडे दुर्लक्ष केल्याने नियमांचे उल्लंघन करून प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना अभय मिळाले आहे. त्याचप्रमाणे भगूर येथील एक व ओढा परिसरातील एका महाविद्यालयातही अशाप्रकारे क्षमतेहून अधिक प्रवेश झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात २०१८ व २०१९ या शैक्षणिक वर्षात कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविल्याचा पुरावा तसेच बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. परंतु, प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.बायोमेट्रिक हजेरीच्या अंमलबजावणीविषयी साशंकताराज्यातील प्रमुख शहरांत विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गालाच उपस्थित राहतात व नियमित वर्गांच्या वेळी कोचिंग क्लासेसमध्ये उपस्थित राहतात. एवढेच नव्हे तर अनेक महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गांसोबत सामंजस्य करार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल घेत या सर्व प्रकारांना चाप लावण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी या वर्षापासून बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु, हा अहावाल सादर करण्यास कनिष्ठ महाविद्यालयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने महाविद्यालयांनी बायोमेट्रिक हजेरीच्या नियमांची अंमलबजावणी केली की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
क्षमताबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:44 AM