भाऊसाहेबनगर : शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात, असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षकवर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.दरम्यान, शिक्षकांची या कामातून त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार व गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊनदरम्यान जवळ जवळ तीन महिने शिक्षक रेशन दुकान, चेकपोस्ट, कंटेन्मेन्ट झोन, टोलनाका, रेल्वेस्थानक याठिकाणी रात्री, विनासुरक्षा साधनासह सेवा देत आहेत. मार्गदर्शक तत्त्व अव्हेरूनही नेमणुका असताना आपत्तीचाकाळ म्हणून शिक्षकांनी सेवा दिली. मात्र शाळा सुरू होत असताना सर्वत्र या सेवेतून शिक्षकांची मुक्तता करावी, अशी मागणी होऊ लागली असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात दि. २३ जूनला अशी मागणी तहसीलदारांकडेतर शिक्षक आमदारांनी शिक्षणमंत्र्याकडे दि. २४ जूनला केली होती. शालेय शिक्षण विभागाने त्याच दिवशी परिपत्रक काढून शिक्षकांची सदर कामातून मुक्तता करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही शिक्षकांची सेवेतून मुक्तता तर झाली नाही शिवाय पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले जात आहेत. वस्तुत: आरोग्य, महसूल, पोलीस या यंत्रणेबरोबर तीन महिने काम केले. त्यात थोडी कसुर झाली तर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.निवेदनावर संजय गिते, समीर जाधव, चंद्रकांत कुशारे, मुकुंद जाधव, बाबा गुंजाळ, देवीदास सोनवणे, नितीन डोखळे, संजय भोई, मधुकर सोनवणे, बाळासाहेब देवरे, एस. बी. जाधव, एस. बी. सैंदाणे, जी. डी. कांदळकर, एम. आर. सूर्यवंशी, किरण जाधव, एल. डी. भरसट आदींच्या स्वाक्षºया आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आता शाळा सुरू होण्याचे नियोजन, आॅनलाइन शिक्षण, प्रवेशप्रक्रि या, पुस्तक वाटप, पोषण आहार आदींसह अन्य कामे करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांना शाळेत बोलविण्याचे मार्गदर्शक तत्त्वही ठरविलेले आहे. शिक्षकांची संख्या अपुरी, कोरोना सेवेत नेमणूक झालेले शिक्षक यामुळे मुख्याध्यापक वर्गाची अडचण होत आहे. याचा परिणाम यावर्षीच्या शैक्षणिक बाबीवर होण्याची भीती निवेदनात वर्तविली आहे. यासाठी शिक्षकांची सदर सेवेतून त्वरित मुक्तता करावी, अशा मागणीचे निवेदन निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंब व गटशिक्षणाधिकारी यांना निफाड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले.
कोरोना सेवेतून मुक्त करण्याच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 11:27 PM
शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात, असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षकवर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ठळक मुद्देशिक्षक संघटनेची मागणी : निफाडच्या नायब तहसीलदारांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन