घोटी : इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, या वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलीस व जिल्हा वाहतूक शाखेकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना वाहनाच्या टपावर अथवा लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या बेकायदेशीर अवैध वाहतुकीला वाहतूक शाखेने अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात लगतच्या अकोले, राजूर, भंडारदरा, खेड, टाकेद, वासाळी आदी भागांसह तालुक्यातील अन्य गावांतून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारहाटसाठी तसेच विविध कामांसाठी घोटीत येत असतात. काही वर्षांपासून या भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या चालकांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याने त्यांचा मुद्दामपणा वाढला आहे. टपावर बसवून तसेच वाहनाला लोंबकळून प्रवाशांची वाहतूक करण्यात येतआहे. या बाबीकडे वाहतूक पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अवैध वाहतुकीला स्थानिक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखा महिन्यातून एकदा कारवाईचा दिखावा करीत आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.