नाशिक : आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे़ परंतु कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन शहिदांच्या कुटुंबाची शेतजमिनीसाठी मात्र शासनाकडून उपेक्षा होत आहे़ आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिलमध्ये पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. यामुळे २६ जुलै हा विजय दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो़ या युद्धात ६ जून १९९९ रोजी जिल्ह्यातील सुरेश विष्णू सोनवणे (रा. काजीसांगवी, ता. चांदवड) आणि एकनाथ चैत्राम खैरनार (रा. देवघट, ता. मालेगाव) या नाशिक जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले. या दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबाची आर्थिकस्थिती जेमतेम होती. शहीद झालेल्या सुरेश सोनवणे यांच्या पत्नी सुरेखा यांना जिल्हा परिषदेत नोकरी देण्यात आली, तर एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा यांना पेट्रोलपंप देण्यात आला या स्वरूपात या कुटुंबीयांना शासकीय मदतीचा हात मिळाला, परंतु लष्करी सेवेत असताना वीरमरण आल्यानंतर शासनाकडून जमीन दिली जाते. परंतु या कुटुंबीयांना अद्याप जमीन देण्यात आलेली नाही. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची उपेक्षा थांबवून त्यांच्या मातापित्यांना नियमानुसार देय असलेली जमीन तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार जयंत जाधव यांनी ५ एप्रिल २०१३ मध्ये विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली होती़ यानंतर त्यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये मुख्यमंत्री व आॅक्टोबर २०१३ मध्ये विधान परिषदेच्या सभापतींना यावरील कार्यवाहीबाबत विचारणा केली होती़ विधान मंडळाच्या सचिवांनी अध्यक्षांच्या सूचनेनुसार राज्याच्या मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे पत्र देण्यात आले होते़ परंतु अद्यापपर्यंत याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे वास्तव आहे़ (प्रतिनिधी)
कारगिल शहीद जवानांच्या कुटुंबीयांची उपेक्षा
By admin | Published: July 26, 2014 12:16 AM