नाशिक : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसताना केवळ राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रशासनाच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन होत असून, फिजिकल डिस्टन्स नियमांकडे दुकानदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मेनरोडवरील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहता निष्काळजीपणामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोरोनाचा सामना करतानाच राज्याच्या आर्थिक उलाढालीसाठी दुकाने सुरू करण्यात आली आहेत. दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी देताना सुरक्षित साधनांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद देण्यात आलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे तसेच दुकाने बंद करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले आहे. मात्र पोलिसांच्या सूचनांकडेदेखील दुर्लक्ष केले जात असल्याची बाब मेनरोड परिसरात प्रकर्षाने जाणवत आहे. मेनरोड येथील दुकाने अत्यंत दाटीवाटीने असून, छोट्या जागेत दुकाने थाटण्यात आलेली आहेत. तेथे साधी पार्किंगलाही जागा नसल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. दुकाने सुरू झाल्यानंतर या दुकानांमध्ये दोन ग्राहक जरी उभे राहिले तरी तिसºया ग्राहकाला जागा होणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्समुळे ग्राहक निघून घातील म्हणून या नियमाकडे दुर्लक्ष केले आहे.शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभाग चिंतेत असताना फिजिकल डिस्टन्स न राखल्यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने या बाजारपेठेत कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून, जिल्हा प्रशासनानेदेखील याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.---------------------------कमी जागेतील दुकानांना सर्वाधिक धोकाग्राहकांना डिस्टन्स नियमांची अंमलबजावणी करण्याचे सांगितले तर आलेले ग्राहक निघून जाईल किंवा उन्हातान्हात दुकानाबाहेर थांबणार नाही, या भीतीने दुकानदारदेखील ग्राहकांना सेवा देत आहे. त्यामुळे मेनरोड बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्स नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. दुकानात आलेल्या ग्राहकांना हाताला सॅनिटायझरदेखील लावले जात नसल्याचे दिसून येते तर दुकानातील सेल्समन्सदेखील सुरक्षित अंतर पाळताना दिसत नाही. कमी जागेतील दुकानांना यामुळे सर्वाधिक धोका आहेच शिवाय ग्राहकांना आणि पर्यायाने नाशिक शहरालादेखील धोका निर्माण झाला आहे.
दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:52 PM