एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही गुटका, तंबाखु, मावा खाणारे भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी थुंकुन घाण करतात. अशा व्यक्तींवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव,कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर,एकलहरेगाव, गंगावाडी या भागात कोरोनाबाबत जनजाग्रुती करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, बचतगट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे पथक तयार करुन नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजाग्रुती करीत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गावातून, वस्ती,वाडी,मळ्यातून औषध फवारणी केली जाते.मात्र काही नागरिक या गोष्टी गांभिर्याने घेतांना दिसत नाहीत.किराणा दुकान, दवाखाने, मेडिकल दुकान, भाजी बाजार, हॉटेल, पानटपरी,कापडदुकान, गँरेज, टपाल कार्यालय, बँक,पेट्रोलपंप, स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी नागरिक मास्क न वापरता फिरतात. ग्रामिण भागात गेल्या आठ पंधरा दिवसात वयस्कर व्यक्ती, विविध आजारांनी ग्रस्त व्यक्ती व काही प्रमाणात कोरोनाग्रस्त यांचा म्रुत्यूदर वाढला आहे. त्यामुळे निधन, दहावे, शोकसभा, वर्षश्राध्द, लग्न समारंभ या निमित्ताने नागरिकांची गर्दी होत आहे. सद्या पित्रुपक्ष असल्याने त्यासाठी स्वयंपाक व जेवणखान यासाठिही लोक एकत्र जमत असून, मात्र फिझिकल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याकडे अनेकजण दूर्लक्ष करतात. घरगुती कार्यक्रम सोडले तर सार्वजनिक ठिकाणी नियमांची पायमल्ली होते त्याकडे स्थानिक प्रशासन 'गावचा मामला' म्हणून दूर्लक्ष करतांना दिसते. या सगळ्याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढतांना दिसतो.