अवैध मद्यविक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : शहरातील विविध भागात अवैध मद्य विक्री जोरात सुरू असून पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी अवैध मद्यविक्रीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महागाईमुळे आर्थिक गणित कोलमडले
नाशिक : पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक व्यावसायिकांना व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
घरेलू कामगार महिलांसमोर समस्या
नाशिक : कोरोना काळात घरगुती काम करणाऱ्या अनेक महिलांचा रोजगार बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कामाच्या आधारावर अनेक महिलांनी बँका आणि वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. काम बंद झाल्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.
खरिपाच्या तयारीला वेग
नाशिक : जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. बाजारपेठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.
कृत्रिम टंचाई निर्माण करून अधिक दराने विक्री
नाशिक : लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक विक्रेत्यांनी काही वस्तू अव्वाच्यासवा दराने विक्री करून आपले उखळ पांढरे केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. मालाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसताना काही वस्तूची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली त्यामुळे नागरिकांना त्या अधिक दराने खरेदी कराव्या लागल्या.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक : नाशिक रेड झोनमधून बाहेर आले असले तरी नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसल्याने काळजी घेणे इतकेच आपल्या हातात असल्याचे सांगण्यात आले आहे.