नाशिक: अनेकविध कारणांमुळे रेशनकार्डधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. गहाळ झालेले रेशनकार्ड तसेच बरीच वर्ष धान्यच घेतलेले नसल्याने बंद करण्यात आलेले रेशनकार्ड काढण्यासाठी एजंटांकडून पैशांची मागणी होतांना दिसते. अधिकृतरित्या नवीन रेशनकार्ड काढणाऱ्यांना कार्ड सहजासहजी मिळत नाही मात्र एजंटामार्फत लागलीच कार्ड मिळते याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
शासकीय सुटीमुळे रस्तेही ओस
नाशिक: महाशिवरात्रीची शासकीय सुटी असल्याने रस्त्यावर नेहमीच दिसणारी वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. शासकीय सुटीबरोबरच मंदिरे बंद असल्याने तसेच ऊनही जाणवत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.
शासकीय कार्यालयांमुळे कार्यालय परिसर तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. गुरूवारी महाशिवरात्रीला सुटीमुळे रस्ते देखील ओस पडल्याचे दिसत होते.
ठक्कर बझार परिसरात भुरटे चोर
नाशिक: ठक्कर बझार या नवीन बसस्थानक परिसराच्या आवारात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. हातोहात प्रवाशांच्या साहित्यांची चोरी केली जात असून मोबाईल हिसकावण्याचे देखील प्रकार घडले आहेत. बसस्थानकाच्या परिसरात तसेच आवारात असलेल्या दुकानांच्या ठिकाणी चोरटे दबाधरून सावज शोधत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही.
जुने सीबीएस बनला युगलांचा अड्डा
नाशिक : जुने सीबीएस येथील पाठीमागील बाजू प्रेमीयुगलांचा अड्डा बनला आहे. अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी या ठिकाणी तासंतास बसून राहत असल्याने अन्य प्रवाशांना तेथे थांबणेही कठिण झाले आहे. प्रेमीयुगलांची भांडणे आणि त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या अशा घटना वारंवार घडत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
हातगाडीवरील विक्रेत्यांना निर्बंधाचा फटका
नाशिक : सकाळी सात ते सायंकाळी सात अशी दुकानांची वेळ देण्यात आलेली आहे. त्याचा फटका खाद्यपदार्थांच्या हातगाडीचालकांना अधिक बसला आहे. सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक महत्वाच्या चौकांमध्ये हातगाडी उभी केली जाते. हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गर्दीही होत असते. परंतु आता जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधामुळे सायंकाळी गाडी सुरू ठेवणे झाले आहे. त्यांचा व्यवसाय सायंकाळीच होत असल्याने त्यांची अडचण झाली आ हे.