नाशिक : नाशकात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या चौघांकडून नऊ देशी बनावटीचे कट्टे व २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी (दि.३१) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नानावली परिसरात युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून कारवाई करीत नानावली परिसरात औरंगाबादच्या वैजापूर येथील अजहर कादर सय्यद (२४), नाशिकच्या जेलरोड परिसिरातील शिल्पा वृंदावन सोसायटीतील सनीदेव उर्फ संदीप बाळू गांगुर्डे (२४), नानावलीतील मोहम्मद अन्वर सय्यद (२५) व बागवानपुºयातील गुलाम अयुब पठाण उर्फ रघु रोकडा (२९) या चौघांना अटक केली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, कुमार चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, रूपाली खांडवी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. दरम्यान, अटक केलेल्या चौघांकडून काही परप्रांतीय इसम नाशकात राहून उत्तर प्रदेशातून अवैध शस्त्र आणून त्यांची शहरात विक्री करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या शस्त्रांच्या तस्करीत मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.गुन्हा दाखलचौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ देशी बनावटीचे कट्टे व २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या चौघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता संशयित आरोपी मध्य प्रदेशातील उमरठी येथून अवैधरीत्या शस्त्रे आणून त्यांची नाशिकमध्ये विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:36 AM