नाशिक : अवैध मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी दोघा संशयितांनी कारवर ‘पोलीस’ नावाचाच फलक लावून नामी शक्कल लढविली. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्र्यंबकेश्वर-जव्हाररोडवरील अंबोली चेकनाक्यावरील भरारी पथकाच्या नजरेपासून ते सुटू शकले नाही़ कार व मद्यासह साडेपाच लाख रुपयांचा मालही हस्तगत केला़ दादरा नगर हवेली व दमननिर्मित मद्याची मोठ्या प्रमाणात चोरटी आयात केली जात असल्याची माहिती विभागीय पथकाचे दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर यांना मिळाली होती़ उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी केली जाते आहे़ सोमवारी सायंकाळी विभागीय भरारी पथकाने अंबोली चेक नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना पोलीस फलक असलेली एमएच ०३ एएम ८७६० क्रमांकाची स्विफ्ट कार आली़ या कारमध्ये संशयित दीपक मोहन जाधव (४४) व राकेश तुकाराम गादगे (४१ रा.दोघे धुळे) बसलेले होते़ कारमधील अवैध मद्यसाठा पकडला जाऊ नये यासाठी त्यांनी पोलीस असल्याचा फलक लावलेला होता़ या कारची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मॅकडॉल व ब्लेंडर या विदेशी मद्याचा सुमारे १ लाख ६ हजार २० रुपये किमतीचा मद्यसाठा व पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला़ या कारमधील संशयित दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक वाय. आर. सावखेडकर, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके यांच्या पथकाने ही कारवाई केली़
‘पोलीस’ असा फलक लावून कारमधून अवैध मद्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:21 AM