संदीप झिरवाळ, नाशिक
पंचवटी /नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती संभाजी महाराज रस्त्यावर मांडसांगवी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून सेव्हन हॉर्स हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर आडगाव पोलिसांनी छापा टाकत हुक्का पार्लर उध्वस्त केला आहे.
अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी आसाम राज्यातील मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हुक्का पॉट तसेच सुगंधित तंबाखू जन्य पदार्थ, फ्लेवरचे डबे असा एकूण पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. माडसांगवी शिवारात असलेल्या सेव्हन हॉर्स हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीजण अनधिकृत हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांना मिळाली होती.
त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तसेच गुन्हा शोध पथकाच्या विकास कंदीलकर, विलास चारोस्कर, निलेश काटकर, सचिन बाहेकर आदींच्या पथकाने सेव्हन हॉर्स हॉटेलमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आसाम राज्यातील हॉटेल मालक रिबुल अहमद बोनोबोईयाना(१९), पाथर्डी फाटयावरील एका सोसायटीतील भुषण जगन्नाथ देवरे (३१), माडसांगवी येथे राहणाऱ्या कृष्णा हिरामण पेखळे (२७) असे तिघे संशयित अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवून बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व उपक्रम येण्याचे साहित्य सेवनाकरिता ग्राहकांना उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार डापसे तपास करत आहेत.