नाशिकरोड : उपनगर येथील सिंधी कॉलनी परिसरात बेकायदेशीररीत्या दारू विक्रीप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २३ हजार ६२५ रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
भर लोकवस्तीत पोलिसांनी बेकायदेशीररीत्या दारू विक्रीच्या अड्ड्यावर कारवाई केली आहे. उपनगर सिंधी कॉलनी परिसरात बेकायदेशीररीत्या दारू विकली जात असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक अतुल पाटील, सहायक उपनिरीक्षक काशिनाथ गोडसे व इतर सहकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता कन्हैयालाल शर्मा यांच्या घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा सहकारी चरणसिंग बल्ला देशी-विदेशी दारू जादा भावाने विकत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेऊन सुमारे चोवीस हजारांची दारू जप्त केली आहे. भर लोकवस्तीत पोलिसांनी बेकायदेशीर मद्यविक्री अड्ड्यावर छापा मारून कारवाई केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.