नाशिक : जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघ तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे व मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्णाच्या सीमांवर गस्त कडक केली असून, शुक्रवारी मध्यरात्री लावलेल्या सापळ्यात गुजरात सीमेवरून नाशिक जिल्ह्णात बेकायदा मद्यसाठा घेऊन येणारे दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. नाशिक जिल्ह्णात प्रामुख्याने दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्र शासित प्रदेश निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत निदर्शनास आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही याच भागातून मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक केली जाण्याची शक्यता गृहीत धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक-गुजरात सीमेवरील गावांमध्ये सापळा रचला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरसूल परिसरातील जंगलात सापळा रचला होता. मध्यरात्री मारुती सुझुकी कंपनीची अल्टोकार ही बेलपाली गावाकडून हरसूल गावाकडे येत असताना अधिकाºयांनी ती अडवून तपासणी केली असता त्यात केवळ दादरा नगरहवेली या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या मॅकडॉवेल व्हिस्कीच्या ९६ बाटल्या तसेच किंगफिशर स्ट्रॉँग बिअरच्या २५२ बाटल्या सापडल्या. त्यानंतर पुन्हा या पथकाने आपला सापळा ठाणेपाडा-हरसूल रस्त्यावर सापळा रचला असता शनिवारी पहाटे ५ वाजता महिंद्रा बोलेरो जीप हरसूल गावाकडे येत असताना तिची तपासणी केली असता त्यामध्येही केवळ दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीची परवानगी असलेल्या किंगफिशर कंपनीच्या बिअरच्या १२० बाटल्या मिलून आल्या. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत व उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक, दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, मनोहर गरुड, जवान विरेंद्र वाघ, विलास कुवर, दीपक आव्हाड, संतोष कडलग आदींनी पार पाडली.
नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 1:12 AM