मालेगाव : तालुक्यातील दहिदी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी उपविभागीय वन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, दहिदी हे वनक्षेत्र आहे. तेथे गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात येते.सदरचे क्षेत्र हे संरक्षित वनक्षेत्र म्हणून होते तरी देखील येथे अवैधरित्या गौणखनिज, नाल्यातील वाळु, माती उत्खनन करुन तिचा व्यवसायासाठी वापर केला जात आहे. वन क्षेत्रात अवैधरित्या बांधकाम करण्यात आले आहे. कोळपाडे वस्ती येथे समाजमंदिर व स्मशानभूमी जवळ बेकादेशिररित्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने वनपरिक्षेत्र अधिकाºयांकडे गेल्या महिन्यात तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. परंतु गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी वनरक्षक व वनपाल यांच्यावर जबाबदारी निश्चित न करता त्यांना पाठीशी घातले जात आहे.निवेदनावर उपसरपंच हिरामण कचवे, ग्रा.पं. सदस्य अनुसया कचवे, सरला कचवे, मनोहर कचवे, मनोज कचवे व ग्रामस्थ योगेश अहिरे, नीलेश भामरे, मनोज कचवे आदिंच्या सह्या आहेत.
दहिदी वनक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:18 PM