यंदा पावसाळा उत्तम झाल्याने नदी दुथडी भरून वाहिली. वाळूच्या प्रमाणातही वाढ झाली. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाला होता. मोसम नदीवर भाजप- सेना सरकारच्या कारकिर्दीत केटीवेअर झाले. यामुळे नामपूरचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. शिवाय ग्रामपंचायतीने नविन विहिर खोदल्यामुळेही नामपूरकरांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ लागला. मात्र आता पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मोसम नदीपात्रातूनच वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. मध्यंतरी वाळू उपसा बंद झाला होता, आता मात्र पुन्हा जोमात सुरू झालेला आहे. घरकामासाठी सायकलीवर थोडी-फार वाळू नेणा-या सामान्य नागरिकांना धमकावून पोलीस ठाण्यात नेले जाते. मात्र राजरोस अवैध वाळू वातूक करणाऱ्यांकडून पोलीस व महसूल खात्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडे तक्रार करायची म्हटली तर चौकी सातत्याने बंद असते व नागरिकांना पोलिसांच्या भेटीसाठी तासन्तास तिष्ठत बसावे लागते. या वाळू उपशाकडे प्रशासनाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास जलस्त्रोत संपुष्टात येईल व दहा वर्षापूर्वी नागरिकांना पाणीटंचाईला जसे सामोरे जावे लागले, तोच धोका आता पुन्हा निर्माण होतो की काय अशी भीती वर्तविण्यात येत आहे.